नागपूर : एमआयडीसी पोलीस ठाण्याच्या हद्दीतील पंधरा वर्षांच्या मुलाचे अपहरण व हत्याकांडाचा कट सूरज रामभाऊ शाहू (वय २०, रा. सीआरपीएफ गेट) याने वेब सिरीज बघून रचल्याचे तपासात समोर आले. यादरम्यान परिसरातील संतप्त लोकांनी या घटनेचा निषेध करीत चक्क पोलीस ठाण्याला घेराव घातला. यावेळी आरोपीला ताब्यात देण्याची मागणी लोकांनी केली.
राज ऊर्फ मंगलू चंदन पांडे (वय १५, रा. इंदिरा मातानगर) असे मृताचे नाव आहे. सूरजने दोन दिवसांपूर्वी राजचे अपहरण करून त्याचा जयताळा परिसरातील हुडकेश्चर खुर्द परिसरात दगडाने डोके ठेचून व हाताची नस कापून खून केला. राजचे काका मनोज पांडे याच्यावरील रागामुळे सूरजने त्याचा खून केला. आपल्या आईवरील अत्याचाराचा बदला घेण्यासाठी त्याने हे कृत्य केल्याचे सांगण्यात येते. सूरज चार दिवसांच्या पोलीस कोठडीत असून आज शनिवारी दुपारी ३ वाजता पोलीस त्याला घटनेची रंगीत तालीम करण्यासाठी घटनास्थळी घेऊन गेले होते. अपहरण व खुनाचा कट त्याने वेब सिरीज बघून रचला होता. पाच महिन्यांपासून तो हा कट रचत होता. दरम्यान या खुनाच्या घटनेच्या निषेधार्थ लोकांनी संतप्त होऊन पोलीस ठाण्याला घेराव घालत आरोपीला ताब्यात देण्याची मागणी केली.