नागपूर : राज्यात अनेक वर्षांपासून प्राध्यापक भरती बंद असल्याने पर्यायी व्यवस्था म्हणून तासिका तत्त्वावरील प्राध्यापकांची नियुक्ती केली जाते. मात्र, यामुळे उच्च शिक्षणाचा बट्ट्याबोळ होत आहे. त्यामुळे तासिका प्राध्यापक ही संकल्पना रद्द करून त्याऐवजी निश्चित वेतनावर कंत्राटी पद्धतीने प्राध्यापक नियुक्तीची मागणी होऊ लागली आहे.
शासकीय व अनुदानित महाविद्यालयात ४० ते ५० टक्के प्राध्यापकांच्या जागा रिक्त आहेत. या रिक्त जागांच्या ठिकाणी तासिका तत्त्वावर प्राध्यापक नेमून विद्यार्थ्यांच्या शिक्षणात खंड पडू नये म्हणून ही व्यवस्था तात्पुरत्या स्वरूपात करण्यात आली. परंतु, नंतरच्या काळात प्राध्यापक भरती न झाल्याने अनेक महाविद्यालयात नियमित प्राध्यापकांपेक्षा तासिका तत्त्वावर काम करणाऱ्या प्राध्यापकांची संख्या अधिक होत गेली.
तासिका तत्त्वावरील प्राध्यापकांना आठवड्याचे फक्त सहा तास काम दिले जाते. नेट, सेट उत्तीर्ण, आचार्य पदवीधारक या प्राध्यापकांना केवळ दहा हजार रुपयांच्या आत मानधन मिळते. या मानधनावर परिवाराचा गाडा ओढणे कठीण असल्याने तासिका प्राध्यापकांवर आज मिळेल ते काम करण्याची वेळ आली आहे.
विशेष म्हणजे, एका बाजूला, त्याच महाविद्यालयात नियमित प्राध्यापकांना रूजू होताच जवळपास महिन्याला ५५ ते ६० हजार रुपये वेतन मिळते तर तासिका तत्त्वावर काम करणाऱ्या प्राध्यापकांना दहा हजार मानधन असा असमतोल आहे. त्यामुळे तासिका तत्त्वावरील प्राध्यापक नियुक्ती बंद करून किमान कंत्राटी पद्धतीने, सन्मानजनक निश्चित वेतन देऊन प्राध्यापक नेमावेत, अशा मागणीचे निवेदन शिक्षण तज्ज्ञ डॉ. संजय खडक्कार यांनी मुख्यमंत्र्यांना दिले आहे.
मग उच्च शिक्षणातच तासिका प्राध्यापक का?
एवढ्या कमी मानधनावर तासिका तत्त्वावर काम करणाऱ्या प्राध्यापकांकडून आपण उच्च शिक्षण गुणात्मकरित्या शिकवण्याची अपेक्षा करणे योग्य ठरेल का?, अभियंते, डॉक्टर जर तासिका तत्त्वावर नियुक्त केले जात नाहीत तर मग उच्च शिक्षणात अशी तासिका तत्त्वावर कामावर घेण्याची पद्धत का? असे प्रश्न डॉ. खडक्कार यांनी मुख्यमंत्र्यांना लिहिलेल्या पत्रात उपस्थित केले आहेत.
उच्च शिक्षणातील गुणवत्ता जपण्यासाठी तासिका तत्त्वावरील प्राध्यापक ही संकल्पनाच रद्द करायला हवी. जोपर्यंत रिक्त जागेवर नियमित प्राध्यापक भरती होत नाही तोपर्यंत त्या जागेवर कंत्राटी पद्धतीने, सन्मानजनक निश्चित वेतन देऊन प्राध्यापक नेमावेत.