नागपूर : उपराजधानीत वन्यप्राण्यांचा मुक्तसंचार आता नवीन राहिला नाही. पण मंगळवारी रात्रीच्या सुमारास तब्बल २२ किलोंचा कासव पाहून नागरिकही आश्चर्यचकित झाले. हा कासव आता वनखात्याच्या ताब्यात असून लवकरच तो नैसर्गिक अधिवासात मुक्त करण्यात येणार आहे. हिंगणा येथील रहिवासी गजानन ढाकु लकर यांना मंगळवारी रात्री हिंगणा परिसरात रस्त्यावर भलामोठा कासव दिसला. वसाहतीतील रस्त्यावर कासवाला पाहून त्यांनी थेट हिंगणा वनपरिक्षेत्र अधिकारी आशीष निनावे यांना भ्रमणध्वनीवरून माहिती दिली. निनावे त्यांच्या कर्मचाऱ्यांना घेऊन घटनास्थळी पोहोचले. कासवाला ताब्यात घेऊन ते सेमिनरी हिल्सवरील ट्रान्झिट ट्रिटमेंट केंद्रात वैद्यकीय तपासणीसाठी घेऊनआले.
केंद्राचे पशुवैद्यकीय अधिकारी डॉ. सय्यद बिलाल अली, डॉ. मयूर काटे, पशुपर्यवेशक सित्रांत मोरे यांनी राज्य वन्यजीव मंडळ सदस्य कुंदन हाते यांच्या मार्गदर्शनात कासवाची तपासणी के ली. यावेळी ट्रान्झिटचे वनपरिक्षेत्र अधिकारी गंगाधर जाधव देखील उपस्थित होते. हा कासव जलचर असून त्याचे नाव ‘लेथ्स सॉफ्टशेल टर्टल’ असे आहे. हा कासव दुर्मिळ असून प्रामुख्याने दक्षिण भारतात आढळणारा आहे. कासवाचे वजन २२ किलो २०० ग्रॅम असून लांबी ८३ सेंटिमीटर व रुंदी ५१ सेंटिमीटर आहे.
शरीराचा घेर १६५ सेंटिमीटर आहे. कासवाचे आरोग्य उत्तम असून वैद्यकीय अधिकाऱ्यांनी आरोग्य प्रमाणपत्र दिल्यानंतर त्याला नैसर्गिक अधिवासात मुक्त करण्यात येईल, असे केंद्रातर्फे सांगण्यात आले.