नागपूर : महापरीक्षा पोर्टल आणि आरोग्य भरतीमध्ये झालेल्या घोटाळ्याची ‘एसआयटी’मार्फत चौकशी करावी, अशी याचिका मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठात दाखल करण्यात आली आहे. यासंदर्भात शुक्रवारी झालेल्या पहिल्या सुनावणीत न्यायालयाने संबंधित सर्व विभागांना कारणेदाखवा नोटीस बजावली.
याचिकेमध्ये महापरीक्षा घोटाळा (२०१७-२०), आरोग्य भरती (फेब्रुवारी -२०२१) आणि आरोग्य भरती (सप्टेंबर -२०१९)मध्ये झालेल्या घोटाळ्याची विशेष तपास पथक स्थापन करून चौकशी करावी, सर्व भरती प्रक्रियेला स्थगिती द्यावी आणि यापुढील सर्व गट-क आणि गट-ड परीक्षा एमपीएससीमार्फत घेण्यात याव्यात, आदी मागण्या याचिकेत करण्यात आल्या आहेत. स्पर्धा परीक्षेतील भ्रष्टाचार आणि विविध समस्यांबाबत एमपीएससी समन्वय समितीच्या वतीने अॅड्. निहालसिंग राठोड यांनी ही याचिका दाखल केली आहे. पुढील सुनावणीत महापरीक्षा पोर्टल आणि आरोग्य विभागाशी संबंधित सर्व विभागांना आपली बाजू मांडावी लागणार आहे. तलाठी, वनरक्षक, नगर परिषद, स्टेट बोर्ड लिपिक आणि आरोग्य भरतीमध्ये निवड झालेल्या प्रत्येक जिल्ह्य़ातील संशयितांच्या नावांचा उल्लेख याचिकेत करण्यात आला आहे. तसेच संबंधितांवर गुन्हा दाखल करून त्यांना निलंबित करण्याची मागणी करण्यात आली आहे. ‘एमआयडीसी’ची परीक्षा काळ्या यादीतील कंपनीने घेतल्यामुळे ती परीक्षाही रद्द करण्यात यावी, अशी मागणीही करण्यात आली आहे.