नागपूर : युवा वर्गामध्ये पक्ष विस्तारण्यासाठी महाराष्ट्र प्रदेश युवक काँग्रेससतर्फे मोठा गाजावाजा करीत सुरू करण्यात आलेला ‘डॉ. श्रीकांत जिचकार लीडर्स अधिछात्रवृत्ती’ उपक्रम पक्षाच्याच इच्छाशक्तीअभावी बारगळला आहे. या उपक्रमांतर्गत पाच महिन्यांआधी राज्यातील शेकडो उमेदवारांचे विविध पातळ्यांवर परीक्षण व नंतर काँग्रेसच्या मंत्र्यांसमोर मुलाखतीही घेण्यात आल्या. मात्र, यानंतरही अंतिम निवड झालेल्या एकाही उमेदवाराला काँग्रेसच्या मंत्र्यांनी सेवेत घेतले नाही. हे युवक अधिछात्रवृत्तीपासूनही वंचित आहेत. विशेष म्हणजे, या उपक्रमाची धुरा सांभाळणारे युवक काँग्रेसचे पदाधिकारी सध्या प्रदेशाध्यक्ष पद मिळवण्याच्या स्पर्धेत व्यक्त असल्याने त्यांनाही या उपक्रमाचा विसर पडला आहे.
काँग्रेसचे ज्येष्ठ नेते श्रीकांत जिचकार यांच्या स्मृतिदिनाचे औचित्य साधत महाराष्ट्र प्रदेश युवक काँग्रेसतर्फे ‘श्रीकांत जिचकार लीडर्स अधिछात्रवृत्ती’ उपक्रमाची जून २०२० मध्ये घोषणा करण्यात आली होती. काँग्रेसपासून दूर जात असलेल्या युवा वर्गाला पक्षासोबत जोडण्याचा हा प्रयत्न होता. या माध्यमातून राज्यातील नवनवीन तरुण राजकारणात व प्रशासकीय कामात पुढे यावेत या उद्देशाने हा कार्यक्रम सुरू करीत असल्याचे सांगण्यात आले होते. सध्याच्या महाविकास आघाडी सरकारमध्ये काँग्रेसचे बारा मंत्री आहेत. प्रत्येक मंत्र्याकडे तीन विद्यार्थी याप्रमाणे राज्यभरातून ३६ विद्यार्थी निवडले जाणार होते. निवड झालेल्या उमेदवारांना अधिछात्रवृत्ती म्हणून मासिक २५ ते ३५ हजार रुपये दिले जाणार होते.
यासाठी युवक काँग्रेसच्या समाजमाध्यमावर ऑनलाइन नोंदणीप्रक्रियेसाठी लिंक उपलब्ध करून देण्यात आली होती. ज्यामध्ये राज्यभरातील २१ ते ३० वयोगटातील शेकडो युवकांनी अर्ज केले. यातील होतकरू उमेदवारांचे विविध पातळ्यांवर परीक्षण करून १२० युवक निवडण्यात आले. निवड झालेल्या युवकांना ज्या मंत्र्यांसोबत काम करायची इच्छा असेल अशा तीन मंत्र्यांच्या नावाची निवड करायची होती. निवडलेल्या मंत्र्यांसमोर या युवकांची पाच महिन्यांआधी मुलाखतही घेण्यात आली. इतर मागासवर्ग बहूजन कल्याण मंत्री विजय वडेट्टीवार यांनी खुद्द या उमेदवारांच्या मुलाखती घेतल्या तर काही मंत्र्यांच्या स्वीय सहाय्यकांनी मुलाखती घेतल्या. या १२० युवकांमधून ३६ जणांची निवडही करण्यात आली. मात्र, या निवडीला पाच महिने लोटूनही एकाही युवकाची सेवा मंत्र्यांनी घेतलेली नाही. या अधिछात्रवृत्ती अंतर्गत काँग्रेसच्या मंत्र्यासोबत युवकांना सहा महिने काम करण्याची संधी मिळणार होती. पुढील ४ वर्षांत एकूण २८८ तरुण-तरुणींना अधिछात्रवृत्ती देण्याची ही योजना होती. परंतु, काँग्रेसचा उपक्रम त्यांच्याच पक्षाच्या उदासीन धोरणामुळे थंडबस्त्यात पडला आहे.
निवड होऊनही पक्षकार्यात संधी नाही…
या उपक्रमासाठी निवड झालेल्या काही युवकांनी नाव छापण्याच्या अटीवर ‘लोकसत्ता’ला सांगितले की, आम्ही दीड वर्षाआधी संपूर्ण प्रक्रिया पूर्ण केली. आधी करोनामुळे हा उपक्रम काही काळासाठी थांबवण्यात आल्याचे ई-मेलद्वारे कळवण्यात आले. मात्र, आता करोना कमी झाल्यावरही काहीच हालचाल नाही.
करोनामुळे हा उपक्रम रखडला होता. संबंधित मंत्री महोदयांना यादी पाठवली आहे. यावर काम सुरू असून लवकरच उपक्रम सुरू होईल. युवकांनी आक्षेप घेण्याचे कारण नाही. – सत्यजीत तांबे, प्रदेशाध्यक्ष, युवक काँग्रेस.