नागपूर : करोनामुळे गेल्या दोन वर्षांपासून थांबलेल्या सोने-चांदी खरेदीचा मुहूर्त नागपूरकरांनी यंदा धनत्रयोदशीला साधला. या शुभ मुहूर्तावर सराफा व्यापाऱ्यांची दालने ग्राहकांनी गच्च भरली होती. विशेष म्हणजे, रात्री उशिरापर्यंत सराफा बाजारही सुरू होता. मंगळवारी शहरात सराफा बाजाराने एकाच दिवशी दोनशे कोटींच्या उलाढालीचा टप्पा गाठला असून सोन्याची विक्रमी खरेदी झाल्याने धनत्रयोदशीलाच सराफा व्यापाऱ्यांची दिवाळी साजरी झाल्याचे चित्र होते.
यंदा करोना आटोक्यात असल्याने सराफा व्यापाऱ्यांनी व्यवसाय चांगला होणार याचा अंदाज बांधला होता. त्यामुळे धनत्रयोदशी, दिवाळी आणि लग्नाच्या हंगामाची जय्यत तयारी त्यांनी पूर्वीच करून ठेवली होती. त्यासाठी आपल्या दालनात सर्व प्रकारच्या दागिन्यांचा साठाही त्यांनी सज्ज करून ठेवला होता. त्याला नागपूरकरांनीही उत्तम प्रतिसाद दिला. सोन्याचे भाव जरी आटोक्यात असले तरी मंगळवारी लहान दागिन्यांची बाजारात सर्वाधिक मागणी होती. त्याशिवाय मंगळसूत्र, गोफ, अंगठय़ा, पायल, कर्णकुंडल, बांगडय़ा, चांदीच्या वस्तू व लक्ष्मीच्या मूर्ती आणि गणरायाच्या मूर्ती तसेच सोन्याचे आणि चांदीचे शिक्के आदींची जोरात खरेदी झाली.
गेल्या दोन वर्षांपासून करोनामुळे नागरिकांनी पर्यटनाला अथवा हॉटेिलग जाणे टाळले होते. तसेच अवांतर खर्चावर आळा घालण्यात आला होता. त्यामुळे त्यांची बचत झाली होती. ती त्यांनी सोन्यात गुंतवणुकीच्या दृष्टीने खर्च केली. शहराच्या प्रत्येक भागात असलेल्या छोटय़ा-मोठय़ा सराफाच्या दुकानात खरेदीसाठी ग्राहकांची गर्दी दिसून आली. सराफा व्यापारी सांगतात बहुतांश नागरिकांचे लसीकरण झाले असून त्यांच्या मनातील करोनाची भीती दूर झाली आहे. त्यामुळे ते घराबाहेर पडत आहेत. दिवाळी,भाऊबिज आणि लग्नाच्या हंगामासाठी देखील लोकांनी धनत्रयोदशीच्या मुहूर्तावर खरेदी केली. शहरात दोनशे कोटींची उलाढाल झाल्याची शक्यता आहे.
यावर्षी ग्राहकांनी अपेक्षेपेक्षा अधिकची खरेदी केली. सध्या सोन्याचे भाव आटोक्यात असून गेल्या दोन वर्षांपासून थांबलेल्या खरेदीची कसर ग्राहकांनी धनत्रयोदशीच्या शुभ मुहूर्तावर भरून काढली. यंदा विक्रमी खरेदी झाली असून सराफा बाजारात जवळपास दोनशे कोटींच्यावर उलाढाल झाली असेल.
– राजेश रोकडे, संचालक रोकडे ज्वेलर्स