औरंगाबाद: करोनाकाळातील गरज लक्षात घेता कमीत कमी कालावधीमध्ये फ्रान्समधून २० आणि अमेरिकेहून १२ यासह ४३ कृत्रिम श्वसन यंत्रं ( व्हेटिंलेटर), १४६ प्राणवायू सांद्रित्रची ( कॉन्संट्रेटर) फिरती मदत याशिवाय पहिल्या टाळेबंदीमध्ये साडेचार लाख तयार खाद्य पदार्थाची पाकिटे अशी मदत औरंगाबादमधील सर्व औद्योगिक संघटनांच्या वतीने करतानाच केलेली मदत कायमस्वरूपी राहावी म्हणून दीड कोटी रुपयांचा निधी जमवून उभा करण्यात आलेला प्राणवायू प्रकल्प गुरुवारपासून सुरू झाला असून सोमवारी त्याचे उद्घाटन केले जाणार आहे.
साथरोगाची दाहकता लक्षात घेऊन औरंगाबाद शहरातील कॉन्फ्रेडेशन ऑफ इंडियन इंडस्ट्रीज, चेंबर ऑफ मराठवाडा इंडस्ट्रीज अॅड अॅग्रिकल्चर, लघु व मध्यम उद्योगाची मासिआ तसेच औरंगाबाद फर्स्ट या उद्योजकांच्या संघटनांनी टीम ऑफ इंडस्ट्रीज असोसिएशन असा एक समूह तयार केला आणि वैद्यकीय पायाभूत सुविधांमध्ये मोठी वाढ केली. मदत किती झाली या पेक्षाही उद्योग संघटनांनी एकत्र येऊन कसे नव्या पद्धतीने काम केले याची दखल आता केंद्र सरकारच्या नीती आयोगाने घेतली असून या मदतीचा औरंगाबाद पॅटर्न आता चर्चेत येऊ लागला आहे.
जसजशा साथरोगातील समस्या वाढत गेल्या तसतशा बदलत गेलेल्या गरजा आणि केलेली मदत यांची माहिती गुरुवारी मुकुंद कुलकर्णी, एन. राम, प्रसाद कोकीळ, कमलेश धूत, प्रतीश चटर्जी, नारायण पवार यांनी गुरुवारी पत्रकारांना दिली. पहिल्या टप्प्यात आरटीपीसीआर चाचण्या कमी होत असल्याने चाचणी यंत्र उपलब्ध करण्यासाठी प्रयत्न करण्यात आले. तसेच चिकलठाणा, शेंद्रा, बजाजनगर व रेल्वे स्टेशन एमआयडीसीमध्ये कामगारांसाठी प्रतिजन चाचण्यांची शिबिरे घेण्यात आली. औद्योगिक क्षेत्रातील २२ हजाराहून अधिक जणांच्या चाचण्या करण्यात आल्या. याच काळात कामगार वर्ग परगावी जात होता, तसेच अनेकांचे खाण्याचे वांदे असल्याने साडेचार लाख जणांना तयार अन्न पाकिटे देण्यात आली. मात्र, या तात्पुरत्या मदतीशिवाय पायाभूत सुविधेमध्ये वाढ करण्यावर भर देण्यात आला. केवळ सामाजिक दायीत्व निधीचा भाग म्हणून नव्हे, तर स्वयंस्फूतीने मदतही मोठय़ा प्रमाणात झाल्याचा दावा औद्योगिक संघटनांच्या वतीने करण्यात आला आहे. व्हेंटिलेटर खरेदी करताना त्यातील बारकावे समजून घेऊन त्याची खरेदी करण्यात आली.
जगभर व्हेंटिलेटरचा तुटवडा असतानाही उपयोगी पडतील असे व्हेंटिलेटर खरेदी करण्यात आले. २०-२२ दिवसात व्हेंटिलेटर येतील यासाठी प्रयत्न केल्यानंतर कोविड रुग्णांना लागणारे १४६ कॉन्सन्ट्रेटर गरजेनुसार वापरास दिले जात आहेत. मदत करताना ती कायमस्वरूपी टीकावी म्हणून प्राणवायू प्रकल्प उभारण्यात आला. त्यासाठी दीड कोटी रुपयांचा निधी जमा करण्यात आला. आयनॉक्स कंपनीच्या मदतीने उभा करण्यात आलेल्या या प्रकल्पाचे उद्घाटन आता सोमवारी होणार आहे. औरंगाबाद फस्र्ट या औद्योगिक संघटनेकडून आता शहरातील स्मशानभूमीमध्ये गॅसदाहिनीची उभारणी केली जात आहे. या प्रकल्पासाठी केवळ तीन दिवसात ३१ लाख रुपयांचा निधी जमवता आल्याचे प्रतीश चॅटर्जी यांनी सांगितले.
समूह कार्याचे कौतुक
औद्योगिक संघटना स्वतंत्रपणे काम करतात. पण औरंगाबादमधील सर्व संघटनांनी एकत्र येत कोविड काळात नवा चमू बनविला. एकेक विषय वाटून घेत पायाभूत सुविधांमध्ये वाढ केली. जिल्हा प्रशासनाबरोबर सहकार्याचे धोरण घेत प्रत्येक संघटनेने निरनिराळी कामे वाटून घेतली. त्याचे आता कौतुक होत आहे.
केंद्राच्या कर्ज योजनेतून ४४६ कोटी
केंद्र सरकारने जाहीर केलेल्या तीन लाख कोटी रुपयांच्या कर्ज योजनेचा औरंगाबाद शहरातील २१०० कंपन्यांना लाभ झाला असून तो सुमारे ४४६ कोटी रुपयांचा आहे. दीड महिन्यापूर्वी केंद्र सरकारच्या अहवालातील ही आकडीवारी असल्याचे उद्योजक मुकुंद कुलकर्णी यांनी एका प्रश्नाच्या उत्तरात सांगितले.