जायकवाडीतून ४६ टीएमसी पाण्याचा वापर , धरणसाठा ३८ टक्कय़ांवर
सुहास सरदेशमुख लोकसत्ता
औरंगाबाद: अतिवृष्टीमुळे गेल्या वर्षी जायकवाडी भरले. धरणात पाणी आले म्हटल्यावर अमाप ऊस लागवड झाली आणि पावसाळा सुरू होण्यापूर्वी सिंचन आणि बिगर सिंचनासाठी वापरण्यात आले ४६ अब्ज घनफूट ( टीएमसी) पाणी. परिणामी जायकवाडतील धरणातील जिवंत पाणीपातळीचे शेकडा प्रमाण पोहचली ३८.८३ टक्कय़ांवर.
जूनपर्यंत ती २४ टक्कय़ांपर्यंत खाली घसरेल. या वर्षी मराठवाडय़ातील ४८ कारखान्यांनी गाळत केलेल्या उसाची आकडेवारी १९३.१९ लाख टन एवढी आहे. अमाप पाणी तेवढाच ऊस हे वर्षांनुवर्षेचे सूत्र या वर्षीही पद्धतशीरपणे जपले असल्याचे दिसून येत आहे. रब्बी पिकांसाठी तीन पाणी पाळया पाणी दिल्यानंतर उन्हाळी भुईमुगासाठी चार किंवा पाच पाणी पाळी देण्याचे नियोजन करण्यात आले.
पण या वर्षी जायकवाडी जलाशयाच्या भोवतील ५० हजार हेक्टरावर ऊस होता. पुढील वर्षी त्यात वाढ होण्याची शक्यता असल्याचे सांगण्यात येत आहे.
जायकवाडीच्या डाव्या कालव्याने २१०० प्रतिसेकंद वेगाने तर ९०० प्रतिसेकंद वेगाने उजव्या कालव्यातून पाणी सोडण्याची प्रक्रिया धरण भरण्यापूर्वीपासून सुरू होती. केवळ पाचसहा दिवसांचा खंड पकडता या वर्षी पाणी शेवटच्या टोकापर्यंत पोहचले. औरंगाबाद, जालना, परभणी, नांदेडपर्यंत जाणाऱ्या पाण्यावर ओलिता क्षेत्रात ऊस लागवड अधिक झाली. एवढी की कारखान्यांचा गाळप हंगाम अगदी पावसाळा तोंडावर येईपर्यंत लांबला. जायकवाडी धरणाचा जिवंत पाणीसाठी ७६ टीएमसीचा असतो. त्यातील ४६ टीएमसी पाणी वापरण्यात आले आहे आणि २९ टक्के पाणी शिल्लक आहे. आतापर्यंत ८४५ दलघमी पाणी सिंचनासाठी वापरण्यात आले आहे. धरणातील पाणी वापरण्यासाठीच असते पण त्यावर एवढा अमाप ऊस पिकवावा का, या वर्षी हा प्रश्न यंदा कोणी विचारत नसले तरी खालवत जाणारी पाणी पातळी आणि लागवड करण्यात आलेला ऊस यांचा हिशेब पुन्हा मांडून पहावा, असे तज्ज्ञ आणि जलसंपदा विभागातील अधिकारी सांगत आहेत.
मराठवाडय़ातील ऊस
गाळपाची आकडेवारी
औरंगाबाद विभागातील कारखाने २२ (सहकारी १२ आणि खासगी १०) गाळप ९९.९३
नांदेड विभागातील कारखाने २६
(सहकारी १० सहकारी आणि खासगी १६)- गाळप -९४.२८
एकूण – ४८ एकूण कारखाने – केलेले गाळप – १९३.१९
या वर्षी जालना जिल्ह्यात सर्वाधिक उस लागवड आणि गाळप झाले. घनसावंगी आणि अंबड तालुक्यात उसाचे कार्यक्षेत्र
२०१९-२०२० १७ हजार ५६२ हेक्टर
२०२०-२१ २५ हजार ८२७ हेक्टर
या तालुक्यातील सात ते आठ लाख टन ऊस राज्यातील १८ कारखान्यांना पाठविण्यात आला. पुढील हंगामातही ऊस अतिरिक्त ठरण्याची शक्यता आहे.
जायकवाडीचा पाणीवापर
जायकवाडीचा पाणीसाठी ७६ अब्जघन फूट
पाण्याची आजची पातळी ४६९.७८८ मीटपर्यंत,
शेकडा प्रमाण ३८.८३
सध्या अस्तित्वात असणारे पाणी अब्जघनफूट २९.७७
अशी आहेत गेल्या ११ वर्षांतील ऊस गाळपाची आकडेवारी पुढीलप्रमाणे
वर्षे गाळप
२०१०-११ १३०.२
२०११-१२ १५७.७६
२०१२-१३ १२७.८९
२०१३-१४ १११.१२
२०१४-१५ १७३.८१
२०१६-१७ ९२.९१
२०१८-१९ २३.३१
२०१९-२० १८९.६८
या वर्षीचे गाळप १९३.१९
सर्व आकडे – लाख टनात