औरंगाबाद : करोनामुळे उद्योगधंदे घसरणीला लागले. मध्यमवर्गीयांची बचत रुग्णालयात खर्ची पडली असली, तरी ग्रामीण भागातील महिला आर्थिक विकास मंडळाने स्थापित केलेल्या एक लाख ४६ हजार महिला बचत गटांनी कर्ज परताव्याचे प्रमाण ९८.२ टक्के एवढे राखले आहे.
करोनाकाळात कर्ज पुनर्गठन केल्यानंतर मुद्रा योजनेतील थकीत कर्जाचे प्रमाण २० टक्क्यांवर, लघु व मध्यम उद्योगातील अनुत्पादक कर्जाचे प्रमाण १३ टक्क्यांवर असताना महिलांनी बचत गटांनी पारदर्शकता जपली. एवढेच नाही तर वर्षभरात ऑनलाइन देवाण- घेवाण करण्याचे शेकडा प्रमाण ६५ टक्यांवर गेले आहे.
अर्थकारण कमालीचे आक्रसलेले असताना ग्रामीण आणि काही प्रमाणात शहरी भागातील महिलांनी बचत गटाचे व्यवहार पारदर्शीपणे पुढे नेले. दुधाळ जनावरे, घरगुती वापरातील लोणची, पापड, मसाले या उद्योगांबरोबर गटशेती करण्यापर्यंत मजल मारणाऱ्या महिला बचत गटाच्या बांधणीचे काम राज्यात गेल्या २० वर्षांपासून सुरू आहे. सुरुवातीच्या काळात चाचणारे बचत गट आता राज्यात सुस्थितीत चालत असून ७४ हजार २६५ बचत गटांनी आयसीआयसीआय आणि सारस्वत बँकेकडून १०६९ कोटी रुपयांचे कर्ज घेतले आणि या कर्ज रकमेच्या ९८.१ टक्के रकमेचा परतावा केला आहे.
कर्ज बुडीत राहण्याचे प्रमाण आहे केवळ १.८ टक्के. बचत गटांसमवेत व्यवहार करण्यात आयसीआयसीआय बँकेने पुढाकार घेतला. त्यांनी ६३ हजार ६५ महिला बचत गटांना ८३६ कोटी ८० लाख रुपयांचे कर्ज दिले. तर सारस्वत बँकेने पाच हजार २०० बचत गटांना ११० कोटी रुपयांचे कर्ज दिले. करोना काळातही कर्ज हप्ते परत करण्याचे प्रमाण राखण्यात महिलांना यश मिळाले असल्याचे आर्थिक विकास मंडळाच्या महाव्यवस्थापक कुसुम बाळसराफ यांनी सांगितले.
शहरी भागात नोकरी जाण्याने व उद्योग धंदे बदलावे लागल्याने काहीशी थकबाकी वाढलेली दिसून येते पण करोना काळात महिलांनी ‘कर्ज आम्ही घेणार आणि कर्ज आम्हीच फेडणार’ ही सवय अंगी बाळगली आहे. संकटे आल्यावरही त्यात खंड पडू दिला नाही.
या वर्षी बचत गटाच्या बैठका घेता आल्या नाहीत. महिलांनाही गावपातळीवर एकत्र भेटता आले नाही. पण आता गावातील महिला बदलू लागल्या आहेत. ऑनलाइन व्यवहाराचे प्रमाण आता ६५ टक्क्यांवर गेले आहे. करोना काळात अडचणी असल्या तरी महिला मार्ग काढत आहेत.
– कुसुम बाळसराफ, महाव्यवस्थापक, महिला आर्थिक विकास महामंडळ
* राज्यात माविमकडून बांधण्यात आलेले गट – १ लाख ४६. त्यात शहरी भागात ९८ हजार ७११ आणि शहरी भागात ४७ हजार २३
* सदस्या संख्या – ग्रामीण भागात १२ लाख दोन हजार, शहरी भागात पाच लाख दोन हजार
* बचत गटांनी घेतलेले कर्ज – १ हजार ६९ कोटी
* कर्ज परताव्याचे प्रमाण -९८.२