शिवसेनेच्या राज्यमंत्र्यांचे ‘सर्वपक्षीय सौहार्द’!

राज्यमंत्री अब्दुल सत्तार यांच्या समवेत खासदार इम्तियाज जलील यांनी अतिवृष्टीतील पीक नुकसानीची पाहणी केली आणि राजकीय क्षेत्रातील अनेकांच्या भुवया उंचावल्या. यामुळे शिवसेना-एमआयएम, सत्तार आणि एमआयएम पक्षातील संबंधावर जिल्ह्य़ात नव्या चर्चा सुरू झाल्या आहेत.

औरंगाबादच्या राजकारणात शिवसेना आणि एमआयएम परस्परांचे कट्टर विरोधक. लोकसभा निवडणुकीत शिवसेनेचे चंद्रकांत खैरे यांचा एमआयएमचे इम्तियाज जलील यांनी पराभव केला होता. असे असले तरी काँग्रेसमधून शिवसेनेत आलेले आणि राज्यमंत्रीपद मिळालले अब्दुल सत्तार आणि एमआयएम यांच्यात पडद्याआडून युती असते अशी टीका केली जाते.

सत्तार शिवसेनेत स्थिरावले आहेत. राज्यमंत्रीपद मिळाल्यानंतर आता एमआयएमचे खासदार इम्तियाज जलील यांच्या समवेतच्या शासकीय पाहणी दौऱ्यामुळे नव्या चर्चा सुरू आहेत. विधानसभा निवडणुकीमध्ये सिल्लोड मतदारसंघात सत्तार यांच्या विरोधात  एमआयएमने उमेदवार उभा केला नव्हता. त्यामुळे सत्तार-जलील यांच्या एकत्रित पाहणी दौऱ्याचे वेगळे अर्थ लावले जात आहेत.

ऐन निवडणुकांमध्ये कोणत्याही पक्षात सहज वावरू शकणाऱ्या राज्यमंत्री सत्तार यांच्या समवेत शासकीय पाहणी दौऱ्यातील खासदार जलील यांची उपस्थिती सध्या जिल्ह्य़ाच्या राजकारणात चर्चेचा विषय आहे. शिवसेनेत पूर्वी विरोधी उमेदवारासमवेत दिसणेही ‘गद्दारी’ ठरत होती. आता नवे चित्र मात्र सौहार्द वाढविणारे दिसत आहे. या भेटीगाठींकडे लक्ष देण्याची गरज नाही.   सत्तार यांना ‘सर्वपक्षीय सौहार्द’ ठेवण्याची सवय आहे, आणि खासदार म्हणून इम्तियाज जलील बैठकांना येणार असतील तर त्यात काही वाईट नाही, असे काँग्रेस जिल्हाध्यक्ष कल्याण काळे यांनी म्हटले आहे.

Comments : 0


    No Comments

Leave a comment