औरंगाबाद : निर्बधांच्या निकषानुसार औरंगाबाद शहरात सारे काही नियमितपणे सुरू झाले आणि नेहमी होणारी गर्दीही अक्षरश: तुडुंब शब्दाला लाजवेज अशी होती. दुपारनंतर जोरदार पावासाने जोर ओसरला पण सोमवारचा दिवस गर्दीचा होता. औरंगाबाद शहरातील सर्वत्र आज सकाळी सात वाजेपासून उठविण्यात आले आणि दुकाने उघडताच ग्राहकांनी गर्दीही केली. जवळपास सहा महिन्याने चित्रपटगृहे, मॉल उघडल्याने सोमवारचा दिवस व्यापाऱ्यांसाठी साफसफाईचा होता. तसाच ग्राहकांच्या गर्दीचाही होता. उद्यानांमध्ये नातवाला घेऊन आजी-आजोबा पोहोचले होते. उद्यानातील झुल्याच्या कडय़ा जवळपास दीड वर्षांने हलल्या. सोमवारचा दिवस उत्साहवर्धक होता. गर्दी आणि विषाणू प्रसार याची गणिते आता दर आठ दिवसाला तपासली जाणार असल्याने पहिल्या दिवशीच्या तुडुंब गर्दीने पुन्हा निर्बंध नको असतील तर आवरा गर्दीला असेही सांगण्यात येत होते.
करोना रुग्णांच्या प्रसाराचा वेग औरंगाबाद शहरात नियंत्रणात असल्याने सोमवारपासून मुखपट्टी अंतर नियमांशिवाय अन्य कोणतेही निर्बंध असणार नाहीत असे महापालिका आयुक्त आणि जिल्हाधिकारी यांच्या संयुक्त स्वाक्षरी असलेल्या आदेशाव्दारे कळविण्यात आले. जीम, क्रीडांगणे यांनाही मुभा देण्यात आल्याने सोमवारी पहाटेपासून लगबग सुरू झाली होती. सकाळी कपडा आणि इलेक्ट्रॉनिक उपकरणाच्या दुकानातही गर्दी दिसून येत होती. दुरुस्तीची उपकरणे आणि दैनंदिन कपडे घेण्याकडे ग्राहकांचा कल असल्याचे दिसून आले. एक दृश्यपटल असणाऱ्या चित्रपटगृहात मात्र आजचा दिवस साफसफाईचा होता. सोमवारी रस्त्यावर चारचाकी, दुचाकी वाहनांची वर्दळ होती. वाहनांमधून लसीकरणासही आजपासून सुरुवात करण्यात आली आहे.