औरंगाबाद : दिल्ली-मुंबई औद्योगिक पट्टय़ातील शेंद्रा औद्योगिक वसाहतीमध्ये दिवसेंदिवस गुंतवणूक वाढत असून डेटॉल आणि श्रीनाथ या दोन कंपन्यांची मिळून ७५० कोटी रुपयांची गुंतवणूक होणार आहे. गुंतवणुकीचा हा वेग कायम ठेवण्यासाठी दळणवळण अधिक नीट व्हावे म्हणून राष्ट्रीय महामार्गाच्या अधिकाऱ्यांशी निती आयोगाचे मुख्य कार्यकारी अधिकारी अमिताभ कांत यांनी चर्चा केली असून शेंद्रा-बिडकीन हा भाग राष्ट्रीय महामार्गाने जोडण्यात येणार आहे. त्याच बरोबर ही औद्योगिक शहरे समृद्धी महामार्गाशी जोडण्यासाठी ४१ कोटी रुपयांचा निधी रस्ते विकास महामंडळाकडे वर्ग करण्यात आल्याचे महाराष्ट्र राज्य औद्योगिक विकास महामंडळाचे मुख्य कार्यकारी अधिकारी पी. अनबलगन यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितले.
अत्याधुनिक पायाभूत सुविधा निर्माण करण्यासाठी शहराच्या सर्व बाजूने चांगले रस्ते करण्यात येणार असल्याचे सांगण्यात येत आहे. औरंगाबाद ते शिर्डी, नगरनाका ते दौलताबाद टी पॉइंट, औरंगाबाद ते पैठण, औरंगाबाद ते जालना या तीन रस्त्यांवरील पुलांच्या चौपरीकरणही राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणामार्फत करण्याची चर्चा सुरू झाली आहे. राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाचे मुख्य कार्यकारी अधिकारी राजीव अग्रवाल यांच्याशी या अनुषंगाने चर्चा झाली असल्याची माहिती खासदार डॉ. भागवत कराड यांनी दिली. औरंगाबाद ते शिर्डी रस्त्यासाठी साईबाबा संस्थानही ५० टक्के निधी देणार असल्याचे सांगण्यात आले. कन्नड येथील ऑट्रम घाटातील प्रस्तावित केलेल्या बोगद्याऐवजी सरळ डोंगर कापून त्याचे चौपदरी केल्यास पाच हजार कोटी रुपये वाचतील असा दावाही करण्यात येत आहे. तशी चर्चा राष्ट्रीय महामार्गाच्या अधिकाऱ्यांबरोबर करण्यात आली आहे. केंद्र सरकारच्या अधिकाऱ्यांनी केलेल्या दौऱ्यामुळे शेंद्रा-बिडकीनमधील रस्ते जोडणी अधिक वेगवान होण्याची शक्यता आहे.
गुंतवणुकीला वेग
शेंद्रा औद्योगिक वसाहतीमध्ये डेटॉल कपंनीकडून ५०० कोटी रुपयांची गुंतवणूक होणार असून हैदराबाद स्थित श्रीनाथ इंडस्ट्रीजच्या वतीने २५० कोटी रुपयांची गुंतवणूक होणार आहे. येत्या काही दिवसांत आणखी काही कंपन्या गुंतवणूक करण्यास इच्छुक असल्याचेही त्यांनी सांगितले.