औरंगाबाद : साखर उत्पादन खर्च आणि मिळणारे दर यामुळे उणे चिन्हांतील साखर कारखान्यांचे आर्थिक अंदाज पत्रके एका बाजूला आणि दुसरीकडे राज्यात १२.३२ लाख हेक्टरावरील लागवडीचा साखर आयुक्तालयाने काढलेला अंदाजावरून येत्या हंगामात ऊस अतिरिक्त ठरण्याची शक्यता आहे. गेल्या वर्षी एवढी म्हणजे ११२ लाख टन साखर उत्पादन होईल पण राज्यातील ३०-३२ कारखाने येत्या हंगामात सुरू होण्याची शक्यता कमी आहे. त्यामुळे ऊस गाळपाविना राहील असे साखर महासंघाचे अध्यक्ष जयप्रकाश दांडेगावकर यांनी सांगितले. दोन वर्षापासून राज्यातील ऊस लागवडीत वाढ होत आहे.
पाऊस अनियमित असला तरी तो येण्याचा हवामान विभागाचा अंदाज आहे. त्यामुळे या वर्षी ऊस लागवड वाढेल असा अंदाज आहे. या वर्षी १२ लाख ३२ हजार ३४४ हेक्टरावर ऊस लागवड होईल. त्यातून १०९६ लाख टन ऊस गाळपासाठी उपलब्ध असेल. संभाव्य गाळप सरासरी उत्पादकता प्रतिहेक्टर ९७ टन व लागवड केलेल्या एकूण क्षेत्रापैकी ९० टक्के उसाचे गाळप झाल्यास १२२ लाख टन साखर तयार होईल असे कोष्टक मांडण्यात आले आहे. देशात ३५ लाख टन साखर इथेनॉल निर्मितीसाठी वापरली जाते. त्यातील ३५ टक्के हिस्सा राज्याचा असतो. त्यामुळे ११२ लाख टन साखर बाजारपेठेत येईल असा साखर आयुक्तालयाचा अंदाज आहे. पण या आकडेवारीला साखर कारखान्यांच्या उणे अंदाज पत्रकामुळे फटका बसण्याची शक्यता आहे. साधारण ३२ कारखाने सुरू होण्याची शक्यता कमी आहे. राष्ट्रीय साखर संघाचे अध्यक्ष जयप्रकाश दांडेगावकर यांच्या मते पुढील आठवड्यात किती कारखाने सुरू होतील याचा नक्की अंदाज येईल. त्यानंतर साखर संघाच्या वतीने राज्य व केंद्र सरकारला कशा स्वरुपाची मदत लागेल याचे प्रारुप सादर करणे शक्य होणार आहे. पण ढोबळ आकडेवारी लक्षात घेता येत्या हंगामात ऊस अतिरिक्त ठरण्याची शक्यता आहे.
तीन जिल्ह्यात लागवड अधिक : कोल्हापूर, सोलापूर आणि अहमदनगर जिल्ह्यात या वर्षी अधिक लागवड होईल असा अंदाज आहे. कोल्हापूरमध्ये एक लाख ६३ हजार, सोलापूरमध्ये एक लाख ७१ हजार तर सांगली आणि सातारा जिल्ह्यातही ऊस लागवड अधिक आहे. मराठवाड्यात उस्मानाबाद आणि जालना जिल्ह्यात ऊस लागवड अधिक असेल असा साखर आयुक्तालयाचा अंदाज आहे. यातील सोलापूर, उस्मानाबाद, जालना हे आवर्षण प्रवण जिल्हे मानले जातात.