औरंगाबाद : इंधन दरवाढीमुळे राज्य परिवहन महामंडळाच्या बसचा प्रतिकिलोमीटर चार रुपयांनी तोटा वाढला आहे. करोनाच्या दुसऱ्या लाटेनंतर बस सुरू झाल्या असल्या तरी गेल्या महिनाभरात केवळ ४० टक्के आसनक्षमता भरलेली असते. त्यामुळे या वर्षी एस.टी. पुन्हा अडचणीत सापडण्याची शक्यता आहे.
गेल्या वर्षी एक किलोमीटर बस चालली तर १९ ते २० रुपये खर्च होत असत. आता तो खर्च २२ ते २३ रुपयांपर्यंत जात असल्याचे विभागीय नियंत्रक अरुण सिया यांनी सांगितले. वेगवेगळ्या मार्गावरून ३५१ बसगाडय़ा जातात. करोनाच्या भीतीमुळे सार्वजनिक वाहतुकीकडे प्रवाशांनी तशी पाठ फिरवली आहे. ४० ते ४५ टक्के प्रवासी असतात. एखाद्या मार्गावर अधिक प्रवासी असतील तरी उभे ठाकून प्रवास करण्यावर प्रशासनाने बंदी घातली असल्यामुळे स्वतंत्र बस सोडावी लागते. पण असे मार्ग खूपच कमी आहेत. डिझेलचा दर आता ९० रुपयांपेक्षा अधिक झाला असून हाच चढता आलेख राहिला तर अडचणी वाढतील असे सांगण्यात येत आहे. एका बाजूला इंधन दरवाढ आणि दुसऱ्या बाजूला करोनाचे निर्बंध यात राज्य परिवहन मंडळाची बस अडकली आहे. दरम्यान मालवाहतूक सेवेला चांगला प्रतिसाद मिळत असून ३० मालवाहतूक गाडय़ांमधून १५ लाख रुपयांपर्यंत उत्पन्न मिळत आहे. दरम्यान औरंगाबाद येथील विभागीय कार्यशाळेतील रस्त्यावर बस चालविण्यासाठी त्याची दुरुस्ती करुन तसे प्रमाणपत्र प्रादेशिक परिवहन महामंडळाकडून देण्यात घेतले जाते. प्रतिमाह ५० गाडय़ांची दुरुस्ती आणि प्रमाणपत्र घेण्याची प्रक्रिया सुरळीत असल्याचा दावा विभागीय कार्यशाळेतील किशोर सोमवंशी यांनी केला. ५० टक्के मनुष्यबळाच्या आधारे करोना नियम पाळून एमएस धातूच्या बसबांधणीचा वेगही पुर्ववत होत असून त्यात कोणतीही अडचण नसल्याचे सांगण्यात येत आहे.