औरंगाबाद/लातूर : मराठवाडय़ातील अनेक भागांमध्ये रविवारी व सोमवारी रात्री जोरदार पाऊस झाला. औरंगाबाद, बीड व नांदेडमधील मिळून सहा मंडळांत अतिवृष्टीची नोंद झाली. औरंगाबाद शहर व जिल्ह्य़ात सोमवारी रात्री तुफान पाऊस झाला. पावसामुळे दुबार पेरणीचे संकट टळले असून रखडलेल्या भागातील पेरण्यांनाही वेग येणार आहे.
औरंगाबादमधील कन्नड मंडळात ६९.७५ मिमी पाऊस झाला. बीडमधील गेवराई तालुक्यातील सिरसादेवी व परळी तालुक्यातील पिंपळगाव मंडळात अतिवृष्टी झाली. या दोन्ही मंडळात अनुक्रमे ६८.७५ व ७३ मिमी पाऊस झाला. नांदेडमधील तरोडा, मुदखेड व बारड या मंडळात अनुक्रमे ९४.५०, ९२.२५ व ९२ मिमी पाऊस झाला.
औरंगाबाद शहरात रात्री ४० मिमी पावसाची नोंद झाल्याची माहिती एमजीएमच्या एपीजे अब्दुल कलाम अंतराळ व विज्ञान केंद्राचे संचालक श्रीनिवास औंधकर यांनी दिली. पावसाचा जोर इतर भागाच्या तुलनेत मराठवाडय़ातील जालना व औरंगाबादेत कमी राहील, असा अंदाज हवामान विभागाच्या तज्ज्ञांनी व्यक्त केला आहे. मात्र, रविवारी व सोमवारी झालेल्या पावसाने व पावसाच्या खंडामुळे लातूर जिल्ह्य़ातील अनेक तालुक्यांत पेरण्या झालेल्या नव्हत्या व जेथे पेरण्या झाल्या तेथील पीकही संकटात होते. गेल्या आठवडाभरापासून जिल्ह्य़ात सर्वच ठिकाणी पावसाची हजेरी असल्याने आता ९५ टक्के पेरण्या पूर्ण झाल्या असून दुबार पेरणीचे संकटही टळले आहे. गेल्या आठवडाभरापासून जिल्हाभर कमी-अधिक प्रमाणात दररोज पावसाची हजेरी आहे. त्यामुळे जमिनीतील ओलावा वाढत असून पिकांना चांगलाच दिलासा मिळाला आहे. खरीप हंगामातील पेरण्याही आता १०० टक्के पूर्ण होतील, अश्सा अंदाज व्यक्त करण्यात येत आहे .
मंगळवार, १३ जुलै रोजी सकाळी आठ वाजता संपलेल्या २४ तासांत लातूर जिल्ह्य़ात सरासरी १३.५ मि.मी. इतका पाऊस झाला आहे. जिल्ह्य़ात या मोसमात पडलेला एकूण पाऊस ३०६.८ मि.मी. इतका आहे. अपेक्षित पावसाच्या १४३.५ टक्के पाऊस आतापर्यंत झाला आहे.