औरंगाबाद: लग्न झाल्यावर राखीपौर्णिमेचा बहाणा करून नववधू पसार झाल्याची घटना औरंगाबादमधील वाळूज (Waluj MIDC, Aurangabad) परिसरात घडली. विशेष म्हणजे मुलीची आर्थिक परिस्थिती हलाखीची असल्याने आधीच नवरदेवानं दीड लाखांपेक्षा जास्त रक्कम नवरीला दिली होती. ही रक्कम आणि लग्नात घातलेले 50 हजाराचे दागिने घेऊन ही नवरी मोठ्या शिताफीने पसार झाली. त्यानंतर हे लग्न लावून देणाऱ्या मध्यस्थ महिलाही बेपत्ता आहेत.
आधी नोटरी पद्धतीने, मग साग्रसंगीत विधी
नेवासा येथील रहिवासी संतोष उत्तम बोडखे हे कापड विक्रीचा व्यवसाय करतात. वाळूज जवळील पंढरपूर येथील सुमनबाई साळवे या मध्यस्थांनी एक स्थळ आणले. संतोष आणि त्याच्या नातलगांनी कांचनवाडीत येऊन मुलगी पाहिली. सुमनबाईने त्यांना अंजली पवार यांच्या फ्लॅटवर नेत तिथे वधू शुभांगी प्रभाकर भोयर (वय 25, रा. रामनगर, एन. 2 सिडको) हिची ओळख करून दिली. यावेळी शुभांगीची आई वंदना भोयर, सुमनबाई साळवे, अंजली पवार व तिचा पती अंतोन पवार हे उपस्थित होते.
दोन्ही पद्धतीने लग्न लावले
20 ऑगस्ट रोजी वरील सर्व मंडळींच्या उपस्थितीत बजाजनागरात संतोष आणि शुभांगीचा नोटरी पद्धतीने विवाह पार पडला. मुलीची आर्थिक परिस्थिती बिकट असल्याने विधीवत लग्नासाठी तिला 2 लाख रुपये देण्याचा प्रस्ताव मध्यस्थींकडून ठेवण्यात आला. ठरल्याप्रमाणे दोन्ही मध्यस्थ महिलांसमोर संतोषने शुभांगीला 1 लाख 65 हजार रुपये दिले. तर 5 हजार रुपये अंतोनच्या खात्यावर जमा केले. 24 ऑगस्ट रोजी त्यांचे विधिवत लग्न लावण्यात आले. यावेळी बोडखे कुटुंबियांनी शुभांगीला मंगळसूत्र, कर्णफुले, पायातील चेन असे 40 ते 50 हजारांचे दागिने घातले.
राखिपौर्णिमेसाठी माहेरी जाण्याचा बनाव
लग्नाच्या दुसऱ्याच दिवशीने शुभांगीने राखीपौर्णिमेला माहेरी जाण्याचा आग्रह धरला. संतोष याने सासू वंदना भोयर यांच्याशी संपर्क साधला असता, त्या दुसऱ्या मुलीच्या प्रसूतीसाठी बाहेरगावी जात असल्याचे सांगितले. त्यामुळे तिला कांचनवाडीतील अंजली पवार हिच्या घरी सोडण्यास सांगितले. त्यानंतर अंजली पवारने दोन दिवसांपूर्वीच फ्लॅट रिकामा केल्याचे कळले. म्हणून संतोषने शुभांगीला पंढरपुरात सुमनबाई साळवे हिच्या घरी सोडले व तो नेवाशाला निघून गेला. शुभांगी मध्यरात्रीतून गायब झाल्याचे सुमनबाईने संतोषला मेसेज करून सांगितले. संतोष व त्याच्या नातेवाईकांनी शुभांगीचा शोध घेतला. पण ती कुठेही सापडली नाही. त्यानंतर सुमनबाई आणि अंजली पवार या दोघीही फरार झाल्याचे कळले.
सातारा ठाण्यात तक्रार
आपली शुद्ध फसवणूक झाल्याचे लक्षात येताच संतोषने तत्काळ एमआयडीसी वाळूज पोलीस ठाणे गाठले. पण ही घटना सातारा ठाण्यातील कांचनवाडीत घटल्याने पोलिसांनी त्यांना सातारा ठाण्यात तक्रार देण्याचा सल्ला दिला.
तीन वर्षांपूर्वीही असे रॅकेट सक्रीय होते
आधी पैसे घेऊन परराज्यातील मुलीसोबत लग्न लावून द्यायचे. लग्नात दागिनेही घ्यायचे आणि काही दिवसातच सासरहून पळून जायचे, अशी घटना तीन वर्षांपूर्वीही घडली होती. ती घटना देखील वाळूजमध्येच घडली होती. पोलिसांनी तपास केल्यानंतर असे रॅकेटच सक्रीय असल्याचे उघडकीस आले होते. आताही अशीच एक घटना सापडल्याने यामागेही मोठे रॅकेट सक्रीय असू शकते, असा