औरंगाबाद शहरातील एक व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. या व्हिडीओत धावत्या बाईकवर एक जोडपं किसिंग करत असताना दिसत आहे. शहरामधून जालन्याला जाणाऱ्या रस्त्यावरील रात्रीच्या वेळी हा व्हिडीओ शूट करण्यात आला होता. दुचाकी वेगाने धावत असताना तरुणी गाडीच्या पेट्रोल टँकवर चालकाकडे तोंड करुन बसलेली या व्हिडीओत दिसत आहे. तसंच यावेळी ते अश्लिल चाळे करत असताना सर्व प्रकार कॅमेऱ्यात कैद करण्यात आला होता. मात्र अशी स्टंटबाजी करणं या दांपत्याला चांगलंच महागात पडलं आहे.
धावत्या बाईकवर दांपत्य एकमेकाला किसिंग करत असल्याचा व्हिडीओ व्हायरल झाला होता. या व्हिडीओत तरुणी टाकीवर बसली होती आणि स्टंटबाजी करत अश्लिल चाळे सुरु होते. ही औरंगाबादमधील घटना असल्याचं सांगितलं जात होतं. औरंगाबादमध्ये अपघातांसाठी आणि सतत वर्दळीचा म्हणून ओळखल्या जाणाऱ्या जालना रोडवर घडल्याचं सांगण्यात येत होतं. मात्र याबद्दल कोणतीच अधिकृत माहिती मिळाली नव्हती.
व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर २४ तासांच्या आत जिन्सी पोलिसांनी या तरुणाला ताब्यात घेतलं आहे. सुरज गौतम कांबळे (२४) असं या तरुणाचं नाव आहे. पोलिसांना व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर त्यांच्या खबरीकडून संबंधित तरुण अपेक्स रुग्णालयाजवळ चहाच्या टपरीवर असल्याची माहिती मिळाली. यानंतर पोलीस उपनिरीक्षक ए.पी. तांगडे यांनी आपल्या पथकासह जाऊन या तरुणाला ताब्यात घेतले.
पोलिसांनी दिलेल्या माहितीप्रमाणे, हा तरुण शहरातील बीड बायपास परिसरात राहत असून एका कापड दुकानामध्ये काम करतो. ३१ डिसेंबरच्या रात्री मित्रांनी त्याला तू गर्लफ्रेंडला धावत्या गाडीवर किस करू शकतो का? असं आव्हान दिलं. यानंतर तरुणाने आपल्या प्रेयसीला बोलावलं आणि क्रांती चौक ते सेव्हन हिलपर्यंत त्याने हा स्टंट केला. पोलिसांनी सार्वजनिक ठिकाणी अश्लील वर्तवणूक करणे आणि निष्काळजीपणे वाहन चालवण्याप्रकरणी गुन्हा दाखल केला आहे.